Bribe Case Pudhari
परभणी

Parbhani Doctor Bribe : डॉक्टर की लाचखोर? ४० हजारांची लाच घेताना पालम ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाला अटक

परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यातील पालम येथील ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता सेवा टेंडर मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. ८) रंगेहाथ पकडले. तडजोडीनंतर ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ.रमेश दगडोबा खंदारे, वैद्यकीय अधिकारी (वर्ग अ), जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी तसेच अतिरिक्त पदभार वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पालम असे लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील एका ३२ वर्षीय तक्रारदाराच्या भावाच्या नावाने परिवर्तन लेबर कॉन्ट्रॅक्टर अँड मल्टी सर्विस ही फर्म कार्यरत आहे. या फर्ममार्फत दि. २७ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय, पालम येथे स्वच्छता सेवेसाठी कोटेशन बेसवर टेंडर भरले होते. सदर टेंडर मंजूर करण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दि.२ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी करताना पंचासमक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच टेंडर मंजुरीचा आदेश देऊन लाच रक्कम तात्काळ आणण्यास सांगितले.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.८) ग्रामीण रुग्णालय, पालम परिसरात सापळा रचला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.खंदारे यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. कारवाई दरम्यान आरोपीच्या अंगझडतीत २,१२० रुपये रोख रक्कम, सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट तसेच त्यांच्या चारचाकी वाहनातून १५ हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. मोबाईल जप्त करण्याबाबत तपास सुरू असून आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र व परभणी यांच्या संयुक्त पथकाने केली. या पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरे यांनी केले असून पोलीस उप अधीक्षक महेश पाटणकर यांनी पर्यवेक्षण केले. पुढील तपासही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा कडक संदेश दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT