Bribe Case Pudhari
परभणी

Parbhani Bribe Case: मतदार यादीत नावासाठी दोन हजारांची लाच घेताना बीएलओ जाळ्यात

परभणीत एसीबीची कारवाई; एसआयआर अर्जातील नावे समाविष्ट करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

परभणी : विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर दोन हजार रुपये स्वीकारणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला (बीएलओ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) परभणी पथकाने बुधवारी (दि. १९) सापळा रचून रंगेहाथ पकडले.

रामेश्वर विलास काळे (वय ३७) सहायक शिक्षक, प्रेरणा विद्यानिकेतन, परभणी हे सध्या परभणी विधानसभा मतदारसंघात बीएलओ म्हणून नियुक्त आहेत. त्यांच्यावर स्टेशन रोडवरील बालाजी भोजनालय येथे ही कारवाई करण्यात आली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी एसआयआर प्रक्रियेअंतर्गत १३ जुलै रोजी बीएलओ रामेश्वर काळे यांच्याकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी काळे यांनी तक्रारदाराला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे २००२ च्या मतदार यादीत नसल्याचे सांगितले. संबंधित नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अडीच हजार रुपये लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला.

शासकीय प्रक्रियेसाठी कोणतीही फी आकारली जात नसतानाही लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. लाच देण्याची इच्छा नसतानाही नाईलाजास्तव तक्रारदाराने पैसे देण्यास होकार दर्शविला. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. परभणी बसस्थानकासमोरील दत्त हॉटेल येथे झालेल्या पडताळणीदरम्यान बीएलओ रामेश्वर काळे यांनी तक्रारदाराच्या कुटुंबातील सदस्यांची नावे एसआयआर प्रक्रियेत समाविष्ट करण्यासाठी तडजोडीनंतर दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.

मागणीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने स्टेशन रोडवरील बालाजी भोजनालय येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने दोन हजार रुपयांची लाच दिली. ही रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रामेश्वर काळे यांना ताब्यात घेतले. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणतीही शासकीय फी नसतानाही पैशांची मागणी केल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीला एसीबीने ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ही सापळा कारवाई करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांनी काम पाहिले. सापळा पथकात सपोउपनि. निलपत्रेवार, पोलीस कॉन्स्टेबल कदम, बोधनकर तसेच चापोकों. नरवाडे यांचा समावेश होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. आश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मतदार यादीच्या कामाला लाचेचा डाग

एसआयआर प्रक्रियेत मतदारांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू असतानाच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदार यादीतील नाव नोंदणीसारख्या मूलभूत लोकशाही प्रक्रियेत नागरिकांकडून लाच मागितली जाऊ नये, यासाठी प्रशासनानेही अधिक दक्षता घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT