Maharashtra local body elections
आनंद ढोणे
पूर्णा : नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला स्थगिती न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (दि. २८) दिल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आरक्षण सोडतीत ५० टक्क्यांहून अधिक मर्यादा ओलांडली गेल्याचा मुद्दा उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मात्र, न्यायालयाने विद्यमान निवडणूक प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे स्पष्ट केले असून याचिकेवरील अंतिम सुनावणी आता २१ जानेवारीला होणार आहे.
कोर्टाने निवडणूक रद्द होण्याची भीती दूर केल्याने उमेदवार, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यानंतर शहरात सर्वच पक्षांनी प्रचारयंत्रणा गतिमान केली असून वातावरण रंगतदार झाले आहे. आरक्षण प्रकरणात काय निर्णय येतो, याची शंका असल्याने उमेदवार प्रचारात कमी उत्साहाने सहभागी होत होते. परंतु, आता कोर्टाच्या ‘ग्रीन सिग्नल’ नंतर सर्व पक्षांनी सभा, कॉर्नर मिटिंग, रॅली, भोंगे गाड्या यांचा धडाका सुरू केला आहे.
पुरुष व महिला उमेदवारांचे शहरभर दैनंदिन दौरे सुरू असून कार्यकर्त्यांची मोठी फळी घराघरात पोचत मतदारांना जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे.
पूर्णा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षित असून एकूण १४ उमेदवार मैदानात आहेत. त्यात प्रमुख उमेदवार असे —
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : प्रेमला एकलारे
शिवसेना (शिंदे गट) – भाजप युती : कमलाबाई कापसे
यशवंत सेना / आ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ पूर्णा शहर विकास आघाडी : . विमलबाई लक्ष्मणराव कदम
वंचित बहुजन आघाडी : आम्रपाली केशव जोंधळे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : शेख हसीना बेगम
एमआयएम : शिरीन बेगम
यातील शिवसेना (उद्धव गट), यशवंत सेना, शिवसेना–भाजप युती, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात खरी लढत असल्याचे चित्र आहे. ११ प्रभागांसाठी प्रत्येक पक्षाने २३ उमेदवारांचे पॅनल उभे केल्याने लढत अधिक चुरशीची झाली आहे.
फक्त तीन दिवसांचा उघड प्रचार शिल्लक असल्याने उमेदवार दिवसरात्र धावपळ करत असून शहर विकासाच्या मुद्द्यांवर जाहीरनामे मांडण्यास गती दिली आहे. काही ठिकाणी आगामी काळात ‘लक्ष्मी अस्त्र’ वापरले जाण्याची शक्यतादेखील नागरिक व्यक्त करीत आहेत.
या निवडणुकीत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी शिवसेना (शिंदे गट)–भाजप युतीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या युतीवर नगरपरिषदेत सत्ता आणण्याची जबाबदारी असल्याने त्या स्वतः प्रचारात सक्रीय आहेत.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्षासह २३ उमेदवार मैदानात उतरवले असून ते शहरात सतत दौरे करून रणनीती आखत आहेत.
तिसरीकडे, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी यशवंत सेना आणि पूर्णा शहर विकास आघाडीमार्फत स्वतःचे उमेदवार उतरवले आहेत. ते शहरातील नागरिकांशी संपर्क वाढवत विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
आगामी दोन दिवसांत मोठमोठ्या सभा आयोजित होण्याची शक्यता असून या निवडणुकीत पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सर्व पक्षांकडून यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.