परभणी

Parbhani Accident : येलदरी पुलावर काळजाचा थरकाप! पिकअप नदीपात्रात कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

जिंतूर : सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा आणि 'मृत्यूपुला'चा विळखा यामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे एका ३१ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पूर्णा नदीवरील अरुंद पुलावरून पिकअप गाडी थेट नदीपात्रात कोसळल्याने ही भीषण दुर्घटना घडली. अंकुश रामेश्वर शिंदे (रा. शिंदे टाकळी, ता. सेनगाव) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरातून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश शिंदे हे मंगळवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास आपल्या पिकअप गाडीने जालना येथून गावाकडे परतत होते. येलदरी येथील जुन्या आणि अरुंद पुलावर आधीच कठडे नसल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी थेट पूर्णा नदीच्या खोल पात्रात कोसळली. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीचा प्रवाह मोठा होता. गाडी पाण्यात पडल्यामुळे आणि रात्रीची वेळ असल्याने अंकुश यांना बाहेर पडता आले नाही. बुधवारी सकाळी पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना वाहन दिसल्यानंतर हा अपघात उघडकीस आला.

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष अन् 'तो' नवा पूल ठरतोय पांढरा हत्ती!

विशेष म्हणजे, विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आधुनिक 'जर्मन टेक्नॉलॉजी'चा (केबल स्टे) पूल बांधला आहे. हा पूल वर्षभरापासून तयार असून केवळ दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते (Approach Roads) अपूर्ण असल्याने तो रहदारीसाठी बंद आहे. परिणामी, वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून जुन्या, मोडकळीस आलेल्या अरुंद पुलावरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या पुरात या जुन्या पुलाचे कठडे वाहून गेले होते, तरीही बांधकाम विभागाने तिथे साधे संरक्षक कठडेही बसवले नाहीत.

४ तास वाहतूक कोंडी आणि ग्रामस्थांचा संताप

बुधवारी येलदरीचा आठवडी बाजार असल्याने पुलावर वाहनांची मोठी वर्दळ होती. अपघातग्रस्त वाहन आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असताना पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या शर्थीने मृतदेह बाहेर काढला. "नवा पूल तयार असूनही आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल?" असा संतप्त सवाल शिंदे टाकळी आणि येलदरी परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

मृत्यूचा सापळा ठरतोय हा पूल!

मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या या पुलावर आतापर्यंत अनेक भीषण अपघात झाले आहेत. कित्येकांनी आपले प्राण गमावले, तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. नवा केबल स्टे पूल आणि जिंतूर-येलदरी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT