पूर्णा (परभणी) : तालुक्यातील संदलापूर येथे वाळू उपशाने निर्माण झालेल्या दहशतीचा एक भीषण चेहरा समोर आला आहे. वाळूने भरलेल्या एका भरधाव टिप्परने गावातील महिला सरपंचाच्या पतीला चिरडल्याची हृदयद्रावक घटना १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात पंडित बालासाहेब मात्रे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टिप्पर पेटवून दिला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदलापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असते. मंगळवारी (दि. १२) सायंकाळनंतर वाळूने भरलेला टिप्पर (क्रमांक एमएच ४३ यू २८५०) अत्यंत भरधाव वेगाने संदलापूर गावातील रस्त्यावरून जात होता. याच वेळी पंडित मात्रे हे रस्त्यावरून पायी चालत जात होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने मात्रे यांना जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, टिप्पर थेट त्यांच्या शरीरावरून गेल्याने त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला.
अपघाताची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी गोळा झाले. मात्रे यांच्या दुर्दैवी अंत पाहून ग्रामस्थांचा संयम सुटला. जमावाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, संताप एवढ्यावरच थांबला नाही; संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्याच ठिकाणी वाळूचा टिप्पर पेटवून दिला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे आणि सपोनि अमर चाऊस यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा संदलापूरमध्ये दाखल झाला. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जमावाला पांगवले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत गावात तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी योग्य समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मयत पंडित मात्रे यांच्या पार्थिवावर पूर्णा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बुधवारी (१३ मे) सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण पूर्णा तालुक्यात वाळू माफियांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या या वाहतुकीवर प्रशासनाने कायमचा लगाम लावावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.