मानवत : मानवत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना सुरूच असून गुरुवारी ता 20 कारने विरुद्ध दिशेने येऊन दुचाकी ला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी वरील एक जणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव यशवंत मुळे असून गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव भगवान निर्वळ असे आहे. हे दोघे जण तालुक्यातील रूढी येथील रहिवाशी असून मानवत शहरातील काम आटोपून ते दुपारी तिनच्या सुमारास आपल्या मोटारसायकल (क्रमांक एम एच 22 एल 2565 ) वरून गावाकडे जात होते.
त्यांची मोटारसायकल अंधारवड मारोती मंदिर समोरील रस्त्यावर आली असता परभणी कडून मानवत कडे येणाऱ्या भरधाव वेगातील कार ( क्रमांक एम एच 14 के क्यू 2996 ) च्या चालकाने विरुद्ध दिशेने येत धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णांलयात दाखल केले असता डॉक्टरांनी यशवंत मुळे यांना मृत घोषित केले. तसेच गंभीर जखमी असलेल्या भगवान निर्वळ यांच्यावर उपचार सूरू आहेत.