Opposition to GR registration of homeopathic doctors
परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना सीसीएमपी कोर्सच्या आधारे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यास परवानगी दिल्याने इंडियन मेडिकल असोसिएशन संतप्त झाली आहे. या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी (दि.१८) परभणीत एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन करताना वैद्यकीय व्यावसायिकांनी शासनाच्या ५ सप्टेंबरच्या परिपत्रकाचा निषेध केला. या निर्णयामुळे वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल, असा आक्षेप डॉक्टरांनी यावेळी नोंदवला. आयएमएच्या म्हणण्यानुसार, एमबीबीएस हा पाच वर्षांचा सखोल अभ्यासक्रम असून त्यात १९ विषयांचा अभ्यास आणि एक वर्षाची इंटर्नशिप असते. त्याउलट सीसीएमपी कोर्स हा केवळ एक वर्षाचा असून आठवड्यातून दोनच दिवस शिकवला जातो.
त्यामुळे अशा अल्प प्रशिक्षणावर आधारित डॉक्टरांकडून अॅलोपॅथिक उपचार देणे धोकादायक ठरू शकते. या निर्णयामुळे चुकीचे निदान, अयोग्य उपचार, अँटीबायोटिक रजिस्टन्स आणि रुग्ण मृत्यूच्या घटना वाढू शकतात. तसेच ही दुहेरी प्रणाली वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ निर्माण करेल आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय दर्जावरही परिणाम होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जर शासनाने हा जीआर, तातडीने मागे घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आयएमएने दिला आहे. आंदोलनात डॉ. राजगोपाल कालानी, विजय बोंडे, निहार चांडक आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी शहरात गुरुवारी २४ तासासाठी खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागातून शहरात आलेल्या गोरगरीब रूग्णांची मोठी तारांबळ उडाली होती.