उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे  (Pudhari Photo)
परभणी

Opration Tiger | राजकीय वादळाची नांदी? ; दोन खासदारांचे दिल्लीकडे विशेष उड्डाण!

खा.संजय जाधव व खा.संजय देशमुख एकाच खाजगी विमानातून रवाना

पुढारी वृत्तसेवा

परभणी, : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. परभणीचे खा.संजय (बंडू) जाधव आणि यवतमाळ-वाशीमचे खा.संजय देशमुख हे मंगळवारी सायंकाळी नांदेड विमानतळावरून एकाच खाजगी विमानाने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली. या दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे.

महाविकास आघाडी व विशेषतः शिवसेना (उबाठा) पक्षातील काही लोकप्रतिनिधी सत्ताधारी महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच दोन महत्त्वाचे खासदार एकत्र दिल्लीला रवाना झाल्याने त्यांच्या दौऱ्यामागील राजकीय हेतूबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नांदेड विमानतळावरून दोन्ही खासदारांनी मंगळवारी एकाच खाजगी विमानातून दिल्ली गाठल्याने राजकीय निरीक्षकांचे लक्ष या घडामोडीकडे वेधले गेले.

दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी भेटीगाठी, पक्षांतर्गत चर्चा किंवा आगामी राजकीय रणनीती यापैकी नेमका कोणता विषय या दौऱ्याच्या केंद्रस्थानी आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय वातावरण मात्र तापले आहे. विशेष म्हणजे, राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे. ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार सत्ताधारी गटाच्या संपर्कात असल्याचे दावे सातत्याने केले जात आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर संजय देशमुख यांच्या काही अलीकडील राजकीय भेटींनी देखील चर्चेला खतपाणी घातले होते. आता त्यात परभणीचे खासदार संजय जाधव यांचाही दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात संजय जाधव हे ठाकरे गटाचे प्रमुख चेहरा मानले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मतदारसंघात मजबूत राजकीय पकड निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे कार्यकर्ते आणि विरोधकांचे बारकाईने लक्ष असते. दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्या भूमिकेबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, या घडामोडींमुळे आगामी काही दिवसांत दिल्लीत कोणत्या राजकीय बैठका होतात आणि त्यातून कोणते निर्णय समोर येतात याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. सध्या तरी या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी नांदेडहून दिल्लीकडे झालेला हा संयुक्त प्रवास ऑपरेशन टायगरच्या चर्चेला नवे बळ देणारा ठरला आहे. परिणामी, राज्याच्या राजकारणात आणखी एखादा मोठा राजकीय भूकंप होणार का, याबाबतची उत्सुकता वाढली असून पुढील काही दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT