Narcotics worth ₹14.5 lakh seized in Manwat
मानवत, पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारा विरोधात मानवत पोलिसांनी धाडसी आणि धडाकेबाज कारवाई करत ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली आणि मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) सरोदे यांच्या नियोजनबद्ध कारवाईत तब्बल १४ लाख ६४ हजार ४०० किंमतीचा एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
सदरील कारवाईने ड्रग्जच्या काळ्या साम्राज्याला मोठा हादरा बसला आहे. गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे मानवत ठाण्यातील पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचत दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ७३ ग्रॅम २२० मिलीग्रॅम एम. डी. अंमली पदार्थ आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या एक स्कुटी जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. मानवत पोलिसांनी अल्पावधीत केलेली ही मोठी कारवाई म्हणजे केवळ जप्ती नव्हे, तर समाजातील युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्ज रॅकेटविरुद्ध उभारलेला कठोर लढा असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तींना इशारा या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी
प्रवृत्तींना स्पष्ट इशारा मिळाला असून, कायद्याचा धाक निर्माण करण्यात मानवत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गजेंद्र सरोदे आणि कारवाईत सहभागी संपूर्ण पोलिस पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी मानवत पोलिसांनी उचललेले हे पाऊल जिल्हा पोलिसांच्या इतिहासातील महत्त्वाच्या कारवायांपैकी एक मानले जात आहे.