पूर्णा : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदगाव शिवार पूर्णा नदीपात्रात चोरट्या पद्धतीने अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारी एक जेसीबी पोकलॅन मशीन व रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर २५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या पथकाने छापेमारी करत जप्त केले. या पोलिस कार्यवाहीत सुमारे २३ लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पूर्णा पोलिसात रेतीचोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती असी की,पूर्णा पोलिस ठाण्याचा हद्दीत येणाऱ्या नांदगाव (ता.परभणी) येथील पूर्णा नदीपात्रात अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोनि विलास गोबाडे, पोशि मंगेश जुक्टे, जमादार काळे,पोशि चौरे,माळकर, होमगार्ड वैद्य, बोबडे यांनी छापेमारी केली. यावेळी नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करत असताना पिवळ्या रंगाची ३ डी एक्स कंपनीची जेसीबी पोकलॅन व विनानंबर ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला.
त्यावेळी पोलीसांना पाहताच वाहन चालक भितीपोटी पळून गेले. सदर रेतीमाफीया टिप्पर चालक मालकाविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनात पोउनि पडलवार करत आहेत. दरम्यान,या अवैधरेती उत्खनन व वाहतूक पोलीस कारवाईमुळे चोरट्या मार्गाने वाळूचे उत्खनन व तस्करी करणाऱ्या माफीयांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.