सेलू: पुढारी वृत्तसेवा: सेलू शहरात अनैतिक संबंधातून अपघाताचा बनाव करून खून झाल्याची घटना ३ मे २०२१ रोजी घडली होती. या प्रकरणातील दोषी मुख्य आरोपी राहुल कासट याच्यासह तीन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आज (दि. १८) सुनावली. परभणीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. नायर यांनी हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३ मे २०२१ रोजी मृताचा भाऊ सतिश करवा यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यात त्यांचा भाऊ सुरेश करवा (मृत) यांचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात सेलु येथील आरोपी राहुल भिकूलाल कासाट याचे मृताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते.
मृत सुरेश करवा यांचा संबंधात अडथळा येत असल्याने आरोपी राहुल याने आपले साथीदार विनोद अंभुरे, विशाल पाटोळे, राजेभाऊ खंडागळे यांच्या सहाय्याने खुनाचा कट रचून सिध्दनाथ बोरगाव शिवारात अपघाताचा बनाव करुन सुरेश याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. सखोल तपासअंती सत्र न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सत्र न्यायालयात अभियोग पक्षाकडून ५१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर आरोपी राहुल भिकुलाल कासाट (वय ४४) यास दुहेरी जन्मठेप व १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास ०६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच विनोद भारत अंभोरे (वय ३०), विशाल सुरेश पाटोळे (वय ३०), राजेभाऊ रुस्तुमराव खंडागळे (वय ३२) या तिघांना दुहेरी जन्मठेप व २५ हजार रुपये दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास जिंतुरचे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीस पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांनी केला. सपोनि कपिल शेळके, गजानन राठोड, सचिन धबडगे, गणेश कौटकर (सायबर सेल) यांनी तपास कामात सहकार्य केले. मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांचे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांनी काम पाहिले.