ST Bus pudhari photo
परभणी

ST bus NCMC card: एसटीचा प्रवास करताय? आजपासून महिला, ज्येष्ठांसाठी NCMC कार्ड अनिवार्य

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आज (दि. १) पासून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) कार्ड अनिवार्य करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

ST bus NCMC card

परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आज (दि. १) पासून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) कार्ड अनिवार्य करण्यात आले. या तारखेपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना सवलतीचे तिकीट केवळ एनसीएमसी कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व आगार व्यवस्थापक, चालक व वाहकांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश महामंडळाच्या वाहतूक विभागाने दिले.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांतील सवलतधारक तसेच विनासवलत प्रवाशांना एनसीएमसी कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. एनसीएमसी कार्डचे नोंदणीकरण आणि वितरण करण्यासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लिमिटेड यांच्या माध्यमातून एसटी आगार, बसस्थानके तसेच आगार हद्दीबाहेरील ठिकाणी अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचे एनसीएमसी कार्ड नोंदणीकरण व वितरण सुरू आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांनाही या व्यवस्थेत समाविष्ट करण्यात येणार आहे. महामंडळाने जारी केलेल्या निर्देशानुसार, १ सप्टेंबरपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डमधूनच देण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांकडे एनसीएमसी कार्ड असणे आवश्यक ठरणार आहे.

या नव्या व्यवस्थेमध्ये एसटी वाहकांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्रवाशांच्या एनसीएमसी कार्डचे टॉप-अप करण्याची जबाबदारीही वाहकांवर सोपविण्यात आली. यासंदर्भातील मानक कार्यप्रणाली (एसओपी) महामंडळाने यापूर्वीच संबंधित विभागांना पाठविली आहे. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, सनियंत्रण समित्या व विभाग नियंत्रकांना आदेश पाठवून आपापल्या अखत्यारितील सर्व आगार व्यवस्थापकांना या निर्णयाची माहिती देण्यास सांगितले. तसेच आगारातील चालक व वाहकांना नव्या कार्यपद्धतीबाबत आवश्यक प्रशिक्षण व सूचना देऊन १ सप्टेंबरपासून निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

परभणी विभागातील मोठ्या संख्येने महिला व ज्येष्ठ नागरिक एसटीच्या सवलतीच्या प्रवास योजनेचा लाभ घेत असल्याने या निर्णयाचा थेट परिणाम हजारो प्रवाशांवर होणार आहे. त्यामुळे ज्या महिला व ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने कार्ड नोंदणी करून घेणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा १ सप्टेंबरपासून सवलतीचे तिकीट मिळविताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. डिजिटल प्रवास व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, भविष्यात इतर सवलतधारक प्रवाशांनाही एनसीएमसी कार्ड प्रणालीच्या कक्षेत आणण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT