मानवत, पुढारी वृत्तसेवा : गाडीसमोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी महामंडळाची बस रस्त्याच्या खाली मोठ्या उतरल्याची घटना रविवारी ता 9 दुपारी 3 च्या सुमारास शहरातील बायपास रोडवर घडली. परंतु या घटनेत बस चालकाने प्रसंगावधान दाखवत अपघात टाळून मोठा अनर्थ घडू नये या साठी आपले कसब पणाला लावले. सदरील घटना मानवत शहराच्या बाहेरून जाणार्या बायपास रोडवर रेणुका मंगल कार्यालयाच्या बाजूला घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की परभणी कडून बीडकडे जाणारी बस एम एच 20 बी एल 3860 ही मानवत शहराच्या बायपास वरून रेणुका मंगल कार्यालयाच्या बाजूने जात होती. या बस मध्ये एकूण 46 प्रवाशी प्रवास करत होते. तेवढ्यात अचानक एक मोटरसायकल स्वार बसच्या दिशेने येऊ लागला त्याचा ताबा सुटल्याने तो बसवर आदळत होता परंतु ही बाब बस चालक गोविंद डाके यांच्या तात्काळ लक्षात आल्याने त्याने आपले प्रसंगावधान दाखवत तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बाजूला नाला असल्या कारणाने सदर गाडी नाल्याच्या अगदी कडेवर जाऊन उभी टाकली. थोडीही गाडी पुढे गेली असती तर मोठा अनर्थ घडून गाडी त्या नाल्यात पुलाखाली अडकली असती. बस चालक गोविंद डाके यांनी दाखवल्या प्रसंगावधानाचे व त्याच्या चालक पणाचे कसब यामुळे चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.