मानवत : नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ अधिवेशनात पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांनी शुक्रवारी (दि.२०) औचित्याच्या मुद्द्यावर मानवत शहरातील विविध विकासकामांसाठी आग्रही मागणी केली. नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून आमदार विटेकर यांनी मानवत शहराच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांसाठी शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, मानवत येथील ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी परभणी येथे जावे लागते. अनेकदा वेळेवर उपचार मिळत नाहीत,त्यामुळे मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करण्यात यावे. मानवत शहरातील पुढील २५ वर्षातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता दरडोई १३५ लिटर पाणी मिळावे, यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी. शहर व तालुक्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी बहुउद्देशीय नाट्यगृह, व्यापारवाढीच्या दृष्टीकोनातून व्यापारी संकुल उभारणे, क्रीडा संकुल, भाजी मार्केटची अनेक दिवसापासूनची मागणी असून याचा विचार करावा. शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार हिंदू स्मशानभूमी, बौद्ध स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानमध्ये जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा विस्तार व सुशोभीकरण करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. शहर स्वच्छतेसाठी भूमिगत गटार योजना आवश्यक आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
मानवत शहर हे नेहमीच महायुतीच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहे. यापूर्वी देखील झालेल्या निवडणुकांमध्ये मानवत शहरवासीयांनी सर्वाधिक मतदान हे महायुतीच्या झोळीत टाकले आहे. आता या मताची परतफेड म्हणून महायुतीचे आमदार राजेश विटेकर यांच्या खांद्याला खांदा लावून मानवत शहरवासीयांसाठी मानवत शहरांचा सर्वांगीण विकास करू, असे नगरपालिकेचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी सांगितले.