परभणीचे रामचंद्र देविदासराव देशमुख ऊर्फ आर.डी. देशमुख, ज्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन केवळ जनतेच्या स्मरणात नव्हे, तर शासनाच्या दिनदर्शिकेत आणण्यासाठी तब्बल सातत्याने ७ वर्षांचा संघर्ष केला.  Pudhari News Network
परभणी

Marathwada Muktisangram Day : आर.डी. देशमुख यांच्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला ध्वजारोहण व सुट्टी

तब्बल सातत्याने ७ वर्षांचा संघर्ष

पुढारी वृत्तसेवा

परभणी : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा शासकीय स्तरावर साजरा होण्याचा रौप्यमहोत्सव १७ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण झाला. या मागे ज्या व्यक्तीचा दीर्घ, संघर्षमय आणि प्रेरणादायी लढा आहे, ते परभणीचे रामचंद्र देविदासराव देशमुख ऊर्फ आर.डी. देशमुख, ज्यांनी हा दिवस केवळ जनतेच्या स्मरणात नव्हे, तर शासनाच्या दिनदर्शिकेत आणण्यासाठी तब्बल सातत्याने ७ वर्षांचा संघर्ष केला.

१९९१ पासून सुरू झालेल्या त्यांच्या पाठपुराव्याचे फलित १७सप्टेंबर १९९८ रोजी मिळाले आणि त्यानंतर दरवर्षी या दिवशी मराठवाड्यात सार्वजनिक सुट्टी आणि शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र हैदराबाद संस्थानात मराठवाडा अडकून पडला होता. निजामाच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळवण्यासाठी येथे स्वतंत्र चळवळ उभी राहिली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलोद्वारे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि मराठवाड्यालाही मुक्तीचा श्वास घेता आला.

मात्र, हा ऐतिहासिक दिवस दशकानुदशके शासनाच्या अधिकृत स्मरणातून वंचित राहिला. याच विस्मरणा विरोधात आवाज उठवला तो परभणीचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आर. डी. देशमुख (अण्णा) यांनी. त्यांनी १९९१ पासून शासनाकडे मागणी सुरू केली की १७सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून घोषित करून ध्वजारोहणास मान्यता आणि सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. आर. डी. देशमुख यांनी ही मागणी फक्त लेखी स्वरूपात न करता, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांनी राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर, केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी थेट भेटीगाठी करत पाठपुरावा केला. या विषयाची गांभीर्यपूर्ण दखल घेण्यात आली आणि २७ मार्च १९९८ रोजी शासनाने अधिसूचना काढत १७ सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.

या निर्णयानंतरचा पहिला शासकीय कार्यक्रम हा १७ सप्टेंबर १९९८ रोजी नांदेड येथे पार पडला. या दिवशी सकाळी प्रभातफेरी, स्मृतीस्तंभाचे अनावरण, ध्वजारोहण, मानवंदना, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार अशा भव्य आयोजनात हा ऐतिहासिक दिवस साजरा झाला. आर. डी. देशमुख यांचा याच दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला.

एक ऐतिहासिक विजय

आज २०२५ मध्ये या निर्णयाला २७ वर्षे पूर्ण होत आहेत. १९९८ मध्ये सुरू झालेल्या शासकीय कार्यक्रमाला आता रौप्यमहोत्सवी वर्ष लाभले आहे. हा दिवस साजरा करताना, यामागचा खरा नायक आर. डी. देशमुख यांचे योगदान समाजमनात आणि प्रशासनाच्या स्मृतीत कायम राहावे, हीच काळाची गरज बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT