परभणी

Parbhani Accident | ऑटो-स्कुटीची समोरासमोर धडक : तरूण ठार, आई गंभीर जखमी

मानवत-परभणी महामार्गावरील किन्होळा शिवारातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Manwath Parbhani Highway Auto Scooty Accident

मानवत : परभणी-मानवत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील किन्होळा शिवारात ऑटो आणि स्कुटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली. गुरुवारी (दि. १७) सकाळी पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला.

कृष्णा बालाजी पोंदाळ (वय २०, रा. पावरलूम, मानवत) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याची आई सारिका बालाजी पोंदाळ (वय ४०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

कृष्णा आणि त्याची आई सारिका हे दोघे एमएच २४ एआर ४६७१ क्रमांकाच्या स्कुटीवरून मानवतहून परभणीकडे जात होते. त्याचवेळी परभणीकडून मानवतकडे येणाऱ्या एमएच २२ एएन २६९८ क्रमांकाच्या ऑटोची त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक झाली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कृष्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.

दरम्यान, किन्होळा-खरवडे शिवारातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. गुरुवारी झालेला अपघातही रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे आणखी अपघात होण्याची शक्यता असून, संबंधित यंत्रणेने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT