कन्हैया नारायण गहुले  Pudhari News
परभणी

मानवतच्या विद्यार्थ्यांचा अंबडच्या वसतीगृहात संशयास्‍पद मृत्यू

Parbhani News| शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मानवत : जालना जिल्ह्यातील अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असलेल्या मानवत शहरातील कन्हैया नारायण गहुले या 19 वर्षीय विद्यार्थ्यांचा सोमवारी ता 21 सकाळी नऊच्या सुमारास संशयास्‍पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, मानवत शहरातील जुने बालाजी गल्ली मध्ये राहत असलेले इंजिनीयर नारायण उत्तमराव गहुले यांचा कन्हैया नारायण गहुले (वय 19)हा मुलगा जालना जिल्ह्यातील अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ष वर्गात शिक्षण घेत असून तेथील तो महाविद्यालयाच्या वस्तीगृहात राहत होता. सोमवारी ता. 21 एप्रिल रोजी महाविद्यालयातून नारायण गहूले यांना तुमचा मुलगा कन्हैया ची तब्येत सिरीयस असल्याने ताबडतोब या असा फोन आला. यामुळे नारायण गहूले, डॉ. राजेश राठोड, प्रवीण वर्मा, कपिल उदावंत व त्यांचे नातेवाईक सकाळी दहाच्या सुमारास अंबड येथे जाण्यासाठी निघाले. अंबड येथील शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर कन्हैयाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी आणखी चौकशी केली असता सदरील विद्यार्थ्यांच्या मित्रांनी दिलेला माहितीवरून कन्हैया हा रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करत बसला होता सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्याला झटके आले. यावेळी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी त्याला एका खाजगी दवाखान्यात नेले असता सदरील डॉक्टरांनी रुग्णाची तब्येत अत्‍यवस्थ असल्याने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तोपर्यंत कन्हैया चा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सोमवारी दुपारी कन्हैयाच्या मृतदेहाचे अंबड येथील शासकीय रुग्णालयात शिवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.

महाविद्यालयावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कन्हैया गहुले याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूस शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व वस्तीगृहप्रमुख जबाबदार असून यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत विद्यार्थ्यांचे वडील नारायण गहुले यांनी केली आहे. सदरील घटना घडली तेव्हा वस्तीगृहातील प्रमुख ही गैरहजर होता व प्राचार्य ही फोन बंद करून गायब झाले आहेत. कन्हैया गहूले याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मानवत शहरात हळहळ व्यक्त होत असून मंगळवारी ता 22 रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT