परभणी, पुढारी वृत्तसेवा; संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना यापुढील काळात धमक्या देण्याचे प्रकार आढळून आल्यास परळीतील त्या त्या नेते मंडळींना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शनिवारी येथे दिला. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी यांचा राजीनामा तातडीने घेण्यात यावा, अशी मागणीदेखील मोर्चाद्वारे करण्यात आली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. जिंतूर रोडवरील नूतन शाळेपासून निघालेला हा मोर्चा सुभाष रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड, नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला. या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे, आमदार सुरेश धस, खासदार संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, आ. राजेश विटेकर, आ. संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे, वैभवी देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. या संपूर्ण प्रकारात अनेक दिवस राज्यातच सोयीने फिरत असलेला आणि नाट्यमयरित्या शरण आलेल्या वाल्मीक कराड याच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज असताना त्याला पोलीस कोठडीतही मदत केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय यांना पोलीस ठाण्यातच काही मंडळींकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे यापुढील काळात असे प्रकार घडले घडल्यास मंत्री धनंजय मुंडे यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
परळी आणि बीडमधील गुंडगिरी मोडीत काढण्याची गरज असून त्या दृष्टीने राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ही या मोर्चाद्वारे करण्यात आली. आमदार धस यांनी या घटनेचा संपूर्ण आढावा घेत वाल्मीक कराड हा खुलेआमपणे आजवर गुणी गुन्हेगारी करत आलेला आहे. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्याचबरोबर या प्रकरणातील खंडणी आणि सरपंच देशमुख यांच्या हत्येमध्ये सखोल चौकशी करून त्याला मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी करताना त्याच्या मागील सूत्रधार म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आ. धस यांनी बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या घोटाळ्यावरही प्रकाश टाकला. उपलब्ध क्षेत्रापेक्षाही जास्त क्षेत्राचे क्षेत्राचा विमा काढला गेल्याचा आरोप त्यांनी आकडेवारीनिशी सादर केला. खासदार जाधव यांनीही परळीतील अवैध धंद्यांवर विशेषतः थर्मलची राख, गोदावरी काठावरील वाळूची तस्करी आदी बाबींवर प्रकाश टाकताना परळीचे लोण गंगाखेडपर्यंत पोहोचले असले तरी ते लोण रोखण्यात आम्ही परभणीकर सक्षम असल्याचा असल्याचे सांगितले. प्रास्तविक सुभाष जावळे यांनी केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.