सेलू : दोन महिन्यांपूर्वी माझे उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींसह तज्ञ शिष्टमंडऴाने लिहून दिलेले चारही शब्द आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनी लिहून दिलेल्या शब्दांची पूर्तता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी दिली आहे. ते सेलू शहरातील बाहेती मंगल कार्यालयाच्या हिरवळीवर आयोजित पत्रकार परिषदेत आज (दि. २२) बोलत होते. Manoj Jarange-Patil
यावेळी ते म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी सरकारने दिलेल्या लेखी उत्तरामध्ये चार शब्द लिलेले आहेत, यातील एक शब्द मी २४ डिसेंबररोजी, पुढील दिशा ठरवताना जाहीर करेल. तर १९६७ च्या नोंदीनुसार त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक, त्यांचे सर्व रक्ताचे सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे सरकार कडूनच मला लेखी देण्यात आले आहे. मात्र, २१ डिसेंबररोजी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले मंत्री गिरिश महाजन, उदय सावंत व संदिपान भुमरे यांच्यासोबत पाच तास चर्चा झाली. यातील जास्तीत जास्त वेळ सगेसोयरे या एका शब्दावर चर्चा होवून देखील शासनाचे प्रतिनिधी यांच्याकडून माझे समाधान झाले नाही. Manoj Jarange-Patil
त्यामुळे शासनाने मला जे लिहून दिले, तेच मी मागत आहे. आणि त्या भूमिकेवर मी आजही ठाम राहणार आहे, अशी ग्वाही जरांगे- पाटील यांनी दिली. शनिवारी (दि. २३) बीड येथील आयोजित सभेपूर्वी शासनाने सरसकट आरक्षण दिले नाही तर पुढील अंदोलनाची दिशा २४ डिसेंबररोजी जाहीर केली जाईल. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. १४४ कलम लागू करणे किंवा नोटीस पाठविणे, यामागे सरकारचे षड्यंत्र आहे. खूप पिढ्यानंतर एखादा जनसमुदाय एकत्र आला आहे. तर तो तुटेल कसा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सरकारने असे प्रयत्न केल्यास परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा अंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेवू, असा शब्द सरकारने दिला होता. दोन महिने उलटून देखील गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. मुंबईला जाण्याची घोषणा केलेली नसताना विनाकारण नोटीस काढून आम्ही मुंबईला यावेत, असाच प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
हेही वाचा