Voting  Pudhari
परभणी

Gram Panchayat Election : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

पुढारी वृत्तसेवा

परभणी : राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. १५) प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. आयोगाच्या या आदेशामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची औपचारिक तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

१५ एप्रिल २०२६ ची यादी ठरणार पाया

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी करताना स्पष्ट केले की, या निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याच मतदार यादीचे संगणक प्रणालीद्वारे प्रभागनिहाय विभाजन करून ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या तयार करण्यात येतील.

यापूर्वी ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही ठिकाणच्या त्रुटी किंवा अनवधानाने वगळल्या गेलेल्या ग्रामपंचायतींसाठी सुधारित आरक्षण सोडतही घेण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे काही भागांत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात विलंब झाल्याने, अशा ग्रामपंचायतींसाठी २४ जुलैपर्यंत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

असा असेल मतदार यादीचा कार्यक्रम

  • अधिसूचनेनंतर आता मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे:

  • २४ जुलै : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

  • २४ ते २९ जुलै : नागरिकांना यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची संधी दिली जाईल.

  • ४ ऑगस्ट : प्राप्त हरकतींची नियमानुसार छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

'महाआयटी'च्या संगणक प्रणालीचा वापर

मतदार यादी तयार करण्यासाठी 'महाआयटी'ने विकसित केलेल्या विशेष संगणक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांना आयोगाकडून युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून दिल्यानंतर तहसील कार्यालयांना स्वतंत्र लॉगिन देण्यात येईल. त्यानंतर संबंधित तहसीलदार ग्रामपंचायतीनिहाय मास्टर डेटा भरतील. विधानसभा मतदार यादीचा 'मदर रोल' डाउनलोड करून 'कंट्रोल चार्ट' तयार केला जाईल आणि त्याच्या आधारे प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाईल.

चूक न करण्याच्या आयोगाच्या सक्त सूचना

आयोगाने मतदार यादी तयार करताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतीतील विधानसभा मतदार यादीतील सर्व पात्र मतदारांचा समावेश झाला पाहिजे, तसेच ग्रामपंचायतीबाहेरील कोणत्याही मतदाराचा समावेश होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेदरम्यान विधानसभा मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा नाव व पत्ता यामध्ये बदल करणे शक्य नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींमध्ये केवळ तांत्रिक किंवा लेखनिक चुका, चुकीच्या प्रभागात समाविष्ट झालेले मतदार किंवा संबंधित प्रभागातील पात्र मतदाराचे नाव वगळले असल्यास अशाच मर्यादित दुरुस्त्या करता येणार आहेत. त्यामुळे मतदारांनी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव आणि प्रभाग तपासून आवश्यक असल्यास वेळेत हरकत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश

आयोगाने प्रारूप आणि अंतिम मतदार याद्यांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देशही दिले आहेत. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयांच्या सूचना फलकांवर ही मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रे आणि केबल टीव्हीच्या माध्यमातूनही नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.

दरम्यान, ही संपूर्ण प्रक्रिया निर्धारित कालावधीत, पारदर्शक आणि बिनचूक पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन आवश्यक अहवाल राज्य निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT