Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष; सहजपूर जवळ्यात शक्तीपीठ महामार्गासाठी जमीनीची मोजणी Pudhari
परभणी

Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष; सहजपूर जवळ्यात शक्तीपीठ महामार्गासाठी जमीनीची मोजणी

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांची ताब्यात घेण्याची कारवाई; जिल्ह्यातील सुमारे दीड हजार एकर जमीन संपादित होणार

पुढारी वृत्तसेवा

परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी आणि पूर्णा या तीन तालुक्यांतून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार असून, यासाठी जिल्ह्यातील सुमारे दीड हजार एकर जमीन संपादित होणार आहे. या प्रक्रियेमुळे एकूण ३१ गावे बाधित होणार आहेत.

शुक्रवारी परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथे जमीन मोजणीसाठी गेलेल्या प्रशासनाच्या पथकाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. आंदोलक शेतकऱ्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

यापूर्वी २७ जुलै २०२५ रोजी प्रशासनाने संपादित होणाऱ्या जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी ती उधळून लावली होती. त्यानंतर शुक्रवारी (२० फेब्रुवारी) प्रशासनाचे अधिकारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा सहजपूर गावात दाखल झाला. प्रशासनाने पूर्वरात्री शेतकऱ्यांच्या घरी नोटिसा देऊन मोजणीबाबत सूचना केल्याचे सांगण्यात आले.

मोजणीदरम्यान सुमारे ५० आंदोलक शेतकरी उपस्थित होते, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विरोध होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच इतर शेतकरी गावात येऊ नयेत म्हणून परिसरात नाकेबंदी करण्यात आली होती. दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांशी झालेल्या वागणुकीबाबत काही स्तरातून नाराजी व्यक्त होत असून, शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT