बोरी : येथील ठाण्यातील पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी कारवाई करत गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरणाऱ्या एका खंजीरधारी तरुणाला जेरबंद केले. आरोपीकडून 15 इंची लोखंडी खंजीर आणि स्प्लेंडर दुचाकी असा तब्बल 50 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दशरथ संतोबा तळपते (वय 22, रा. माक ता.जिंतूर) हा युवक (दि.16) भल्या पहाटे 1.05 वाजेच्या सुमारास बोरी ते जवळा रोडवरील माकपाटी परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 15 इंच लांबीचा धारदार लोखंडी खंजीर मिळून आला. खंजीराच्या मुठीस पांढरी रस्सी गुंडाळलेली होती.
आरोपी स्वतःची ओळख लपवून गावात फिरत असल्याने पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपीकडून हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र. एमएच 22 बीएफ 1063 देखील जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 50 हजार 700 रुपये इतकी आहे. याप्रकरणी बोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस शिपाई प्रकाश मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पोलिस हवालदार कंठाळे हे करीत आहेत. दरम्यान, गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपी फिरत असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी कारवाई करत संभाव्य अनर्थ टाळल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.