Purna taluka kharif crop insurance
पूर्णा : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा हप्ता भरण्याकडे यंदा मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली आहे. २५ दिवसांत केवळ २६ टक्के शेतकऱ्यांनीच पिकविमा हप्ता भरला असून, गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा अत्यंत कमी आहे.
पूर्णा तालुक्यात ५६ हजार खातेदार शेतकरी आहेत. ऊस, हळद, भाजीपाला वगळता अंदाजे ५२ ते ५४ हजार हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीयोग्य आहे. यंदा केवळ १८,२०७ शेतकऱ्यांनी २०,८४६.४९ हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी ३२ लाख २५ हजार ७८२ रुपये पिकविमा हप्ता भरला आहे. गतवर्षी ८० ते ८५ टक्के शेतकऱ्यांनी हप्ता भरला होता, मात्र यंदा हा आकडा फक्त २६ टक्क्यांवर आला आहे.
७४ टक्के शेतकरी अद्याप विमा हप्त्यापासून वंचित आहेत. हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून, आता केवळ ६ दिवस शिल्लक आहेत. १ रुपयात विमा हप्ता योजनेच्या बंदीचा परिणाम मागील वर्षी केंद्र सरकारने १ रुपयात पिकविमा हप्ता भरण्याची योजना राबवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विमा घेतला.
यंदा ही योजना बंद करून खरीपासाठी २ टक्के आणि रब्बीसाठी १.५ % प्रिमियम आकारण्यात येत आहे. नवीन योजनेनुसार नुकसान भरपाई थेट काढणीवेळी उत्पादनाच्या तुलनेत दिली जाणार आहे, पूर्वीप्रमाणे पावसाचा खंड किंवा काढणीनंतर नुकसान यावर भरपाई मिळणार नाही.
यंदा सोयाबीनसाठी प्रति हेक्टर १,१६० रुपये हप्ता भरावा लागत आहे, त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे शेतकरी विमा हप्ता भरण्यास टाळाटाळ करत आहेत. अल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यासाठी पैसे उभे करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी उसनवारी व व्याजावर पैसे काढून पेरणी केली आहे, त्यामुळे अतिरिक्त खर्च टाळण्याकडे कल आहे.