परभणी

Parbhani road news | कोट्यवधींचा निधी, पण काम निकृष्ट; चारठाणा महामार्गावरील रस्ता रुंदीकरण वादाच्या भोवर‍्यात

देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले संबंधित विभागाचे अभियंता मात्र 'झोपेचे सोंग' घेऊन गप्प बसले आहेत

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : नांदेड-संभाजीनगर या अत्यंत वर्दळीच्या राज्य महामार्गावरील पिपरी गीते ते जिंतूर दरम्यान सध्या रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून, गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे ६४ कोटींचा हा रस्ता काही महिने तरी टिकेल का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

गेल्या महिनाभरापासून या २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. नियमानुसार या कामात दर्जेदार मुरुम आणि गिट्टी (खडी) वापरणे बंधनकारक असताना, गुत्तेदाराकडून मुरुमामध्ये थेट माती मिश्रित करून काम रेटले जात असल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर, जुन्या झालेल्या डांबरी रस्त्यावर योग्य प्रक्रियेविना थेट नवीन डांबराचा थर टाकून केवळ वरवरची मलमपट्टी केली जात असल्याचे चित्र आहे.

राजकीय वरदहस्तामुळे गुत्तेदार कोणालाच जुमानेना!

या महामार्गावरून २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्ता रुंदीकरणाच्या या निकृष्ट दर्जाबाबत अनेक स्थानिक वृत्तपत्रांनी आवाज उठवला आहे, तसेच नागरिकांनीही तीव्र आक्षेप घेतला आहे. मात्र, हा गुत्तेदार कोणालाही न जुमानता आपल्या मर्जीनुसार काम करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या गुत्तेदाराला नक्की कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात असून, काही राजकीय मंडळींच्या मूकसंमतीमुळेच ही लूट सुरू असल्याची उघड चर्चा नागरिकांमध्ये आहे.

कोट्यवधींच्या निधीला 'माती'चे ग्रहण

मिळालेल्या माहितीनुसार, पिपरी गीते ते जिंतूर या २२ किमीच्या रस्त्यासाठी मूळ निधी जवळपास ९४ कोटी रुपयांचा प्रस्तावित होता, परंतु संबंधित गुत्तेदाराने हे कंत्राट ६४ कोटी रुपयांमध्ये पदरात पाडून घेतले आहे. टेंडर कमी रकमेत घेतल्यामुळेच आता खर्चात कपात करण्यासाठी कामाचा दर्जा खालावला जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही जर रस्ता निकृष्ट होणार असेल, तर या निधीचा उपयोग काय, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

संबंधित अभियंता 'झोपेच्या सोंगात'

एकीकडे गुत्तेदार जनतेच्या पैशांवर डल्ला मारत रस्ता मातीमोल करत असताना, या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले संबंधित विभागाचे अभियंता मात्र 'झोपेचे सोंग' घेऊन गप्प बसले आहेत. या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, या मुजोर गुत्तेदाराला वेसण घालून रस्त्याचे काम दर्जेदार करून घेण्यासाठी आता कोण 'कानमंत्र' देणार? याकडे चारठाणा आणि जिंतूर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT