Parbhani Banjara Morcha pudhari photo
परभणी

Parbhani Banjara Morcha : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी आक्रमक

हजारो समाजबांधवांचा मोर्चात सहभाग; महिलांचीही मोठी उपस्थिती, व्यापाऱ्यांचा बंदला प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

जिंतूर : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी बुधवारी जिंतूर शहरात बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो समाजबांधवांसह महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत आरक्षणाच्या मागणीला जोरदार पाठिंबा दिला. आरक्षणाच्या मागणीसह गेल्या काही दिवसांपासून उपोषण करणारे विनोद आडे यांच्या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

स्व. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, येलदरी कॉर्नर, मेन चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील विविध घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर बंजारा समाजाच्या एकजुटीचे चित्र दिसून आले.

यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चेकरी पुन्हा वसंतराव नाईक पुतळा परिसरात परतले. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विनोद आडे यांनी ५ सप्टेंबरपासून जिंतूर येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाची शासनाने तातडीने दखल घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

तसेच न्यायमूर्ती तहिलयानी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कामकाजाची सद्यस्थिती, अहवाल शासनाला सादर झाला आहे किंवा नाही, झालेली कार्यवाही याबाबत अधिकृत माहिती द्यावी. तसेच आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या समाजबांधवांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि पात्र कुटुंबीयांना शासकीय नोकरी देण्याची मागणी करण्यात आली.

व्यापाऱ्यांचा बंद

आंदोलनाला उत्स्फूर्त साथबंजारा समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर शहरातील व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत आपापली आस्थापने बंद ठेवून आंदोलनाला प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल बंजारा समाजाच्या आंदोलकांनी व्यापारी बांधवांचे आभार मानले.

महिलांची लक्षणीय उपस्थिती

एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग राहिला. मोठ्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झाल्याने आरक्षणाच्या मागणीला व्यापक सामाजिक पाठिंबा असल्याचे चित्र जिंतूरमध्ये पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT