चारठाणा : भंडाऱ्याच्या दिवशी दर्शनासाठी मंदीरात गेलेल्या चार ते पाच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार घडला. दरम्यान दोन महिलांच्या पतींनी या संदर्भात चारठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चारठाणा यात्रा महोत्सवाला दि. ९ जानेवारी पासून प्रारंभ झालेला आहे. भंडारा असल्याने अनेक महिलांनी श्री संत जनार्धन महाराज मंदीरात दर्शनासाठी रांगा लागव्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर अनेक महिलांच्या गळयातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार घडला.
यामध्ये संदिप देशमुख यांच्या पत्नीच्या गळयातील १० ग्रॅमचे अंदाजे ७० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र तर गजानन थोरात यांच्या पत्नीच्या गळयातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीला गेले. या संदर्भात संदीप देशमुख व गजानन थोरात यांनी दि. ९ जानेवारी रोजी रात्री उशीरा दागिने चोरीला गेल्याचा तक्रार अर्ज चारठाणा पोलीस ठाण्यात दिला आहे. या चोरीचा पोलिसांनी लवकर शोध लावण्याची मागणी महिला वर्गामधून होत आहे.