गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची शुक्रवारी (दि. २२) गंगाखेड शहरात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणत: २ लाख मराठा समाजबांधव यावेळी उपस्थित राहणार असल्याने ही सभा विक्रमी होणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी गुरुवारी (दि. २१) गंगाखेड शहरात सभास्थळी भेट देऊन उपविभागीय कार्यालयात सभेच्या निमित्ताने एकंदरीत आढावा घेतला.
मागील १५ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या शहरातील सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. शहरातील नवीन बाजार समिती मार्केट यार्डच्या भव्य मैदानावर दुपारी ३ वाजता मनोज जरांगे यांची जाहीर सभा होईल. सभेच्या निमित्ताने शहरात वाहतूक व्यवस्था तसेच सभास्थळीच्या प्रत्येक नियोजनाचे काटेकोर आखणी मराठा आरक्षण तालुका समन्वय समितीचे स्वयंसेवक घेत आहेत. भव्य मैदान तसेच मैदानावर उपस्थित त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी करण्यात आलेली बॅरिकेटिंग व्यवस्था व माइक सिस्टीम याचा संपूर्ण आढावा आज गुरुवारी (दि.२१) दिवसभरात संयोजकाकडून घेण्यात आला. शहरात तसेच गंगाखेड, पालम, पूर्णा व परिसरातील गावांमध्ये बॅनर्स तसेच सभेची जाहिराती सोशल मीडियासह सर्वत्र झळकत आहेत.
दरम्यान शहरात शुक्रवारी होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या विक्रमी सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी गुरुवारी (दि.२१) सभेच्या निमित्ताने एकंदरीत पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला.
सभेचे संयोजक मराठा आरक्षण तालुका समन्वय समितीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेत सभेच्या निमित्ताने संवाद साधून सूचना केल्या. सभेच्या ठिकाणी स्वतः एसपींनी भेट देत सभास्थळाची एकंदरीत पाहणी केली. उद्याच्या सभेसाठी सुमारे ३०० पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौज फाटा बंदोबस्तासाठी असणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.