In Parbhani district, statues of Shivaji Maharaj appeared in four villages in a single night.
मानवत, पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्ह्यातील तालुक्यात मांडेवडगाव, उक्कलगाव, नागरजवळा आणि केकरजवळा या चार गावांत रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अनधिकृतपणे बसविल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आला. या प्रकारामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
मिळालेली माहिती अशी की, चारही गावांत सार्वजनिक ठिकाणी अचानक पुतळे बसविल्याचे समोर आल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. प्रशासनाने मांडेवडगाव येथील पुतळा बाजूला करण्याची कारवाई यशस् वीरीत्या पार पाडली. मात्र, केकरजवळा, नागरजवळा आणि उक्कलगाव येथील पुतळे अद्यापही जैसे-थे स्थितीत असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तपासासाठी पोलिसांची गस्त
वाढली या चारही ठिकाणी पुतळे नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने बसविले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे कृत्य करण्यात आले असून, संबंधितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नागरजवळा येथील घटनेबाबत उशिरापर्यंत सविस्तर माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
प्रशासनाचे शांततेचे आवाहन सामाजिक सलोखा बिघडू नये आणि कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सर्वच गावांत सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित ग्रामस्थांनी प्रशासकीय प्रक्रियेचे पालन करून सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
केकरजवळ्यात प्रशासनाची धाव; दोन दिवसांत ग्रामसभा
केकरजवळा : येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील मोकळ्या मैदानात विनापरवाना पुतळा बसवल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बोरकर व नायब तहसीलदार स्वप्ना अंभोरे यांनी तातडीने धाव घेतली.
पुतळा रीतसर परवानगी घेऊनच बसवावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या. "ग्रामपंचायतचा पुतळ्यास विरोध नाही, मात्र कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची आहे. येत्या दोन दिवसांत विशेष ग्रामसभा घेऊन रीतसर नोटीस काढून परवानगीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल," अशी माहिती सरपंच संतोष लाडाने यांनी दिली. तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.