Youth Hunger Strike on Road Construction Suhagan
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यातील हयातनगर - सुहागन- पूर्णा (४२८) राज्य मार्गाची सुधारणा व मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून एका कंत्राटदारास देण्यात आले आहे. या कामात दोन्ही बाजूंच्या रस्ता साईड पट्टा भरणे व डांबरीकरणाचे काम अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. हे काम इस्टिमेट प्रमाणे करण्यात यावे. व झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, यामागणीसाठी सुहागन येथील सामाजिक कार्यकर्ते खुशाल भोसले यांनी सा. बां. उपविभाग पूर्णा कार्यालयासमोर सोमवार (दि. ९) पासून बेमुदत आमरण उपोषण चालू केले आहे.
उपोषणकर्ता मृग नक्षत्रातील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात दोन वेळा भिजला गेला आहे. त्याची प्रकृती बिघडली आहे. तरीही त्यांची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता संजयकुमार देशपांडे यांनी सांगितले की, रस्त्याचे काम अंदाज पत्रकानुसारच होत आहे. तरीपण उपोषण करण्यात येत असल्यामुळे परभणी कार्यकारी अभियंता दक्षता व गुणनियंत्रण विभागा कडे कामाची तपासणी करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती उपोषणकर्ते यांना दाखवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, ते मान्य करत नाहीत. असे असले तरी संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदाराने मात्र उपोषण प्रकरण हाताळण्याची जबाबदारी ही अभियंता यांची असल्याचे म्हटले आहे.