सोनपेठ : शहरातील इनामदार कॉलनीजवळ असलेल्या तेली समाजाच्या स्मशानभूमी परिसरात मानवी कवटी आढळल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.9) आठवडी बाजार दिवशी उघडकीस आली. परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्मशानभूमी परिसरात संशयास्पद अवस्थेत मानवी अवशेष दिसत असल्याची माहिती नागरिकांकडून पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण तसेच पोलीस उपनिरीक्षक अजय किरकण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती.
पोलिस तपासात स्मशानभूमीमध्ये एका अनोळखी पुरुष व्यक्तीची विघटीत अवस्थेतील मानवी कवटी आढळून आली. कवटीवर केस असल्याचे तसेच चेहऱ्यावर बारीक मिशीचे अवशेष दिसून आले. याशिवाय कवटीच्या आजूबाजूला मानवी हाडांचे तुकडे विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे ही कवटी अलीकडील काळातील आहे की जुनी, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मोबाईल फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून आवश्यक नमुने संकलित करण्यात आले असून डीएनए तपासणीच्या माध्यमातून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर कवटी कोणाची आहे, ती या ठिकाणी कशा परिस्थितीत आणली गेली किंवा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपाताचा, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करीत आहेत.
याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.