पेठशिवणी : तालुक्यातील पेठशिवणी येथील नव्याने उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, अन्यथा परिसरातील 24 गावांचे ग्रामस्थ 29 सप्टेंबर 2025 पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भगवान करंजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
राज्य शासनाने पेठशिवणी येथे चार वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून सव्वा कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून दिला होता. सरकारी गायरान जमिनीवर आरोग्य केंद्राची भव्य इमारत तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र या केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटूनही अद्याप अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही.
यासंदर्भात परभणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता, नियुक्तीसाठीचा प्रस्ताव एक वर्षांपूर्वीच राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक (भा. प्र. से.) यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे समोर आले. मात्र मंजुरी न मिळाल्याने हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार परभणी जिल्हा प्रशासनाने पालम तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत जून 2025 मध्ये पेठशिवणी आरोग्य केंद्रातून मर्यादित सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे ही सेवा अल्पावधीतच विस्कळीत झाली. परिणामी नागरिकांना खाजगी दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागत असून उपचारासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शासनाने तातडीने या केंद्रातून दर्जेदार आरोग्य सेवा सुरू करावी, अन्यथा 29 सप्टेंबरपासून केंद्राच्या परिसरात 24 गावातील नागरिकांसह बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात आरोग्यमंत्री मा. ना. प्रकाश आंबिटकर, आरोग्य राज्यमंत्री व परभणीचे पालकमंत्री मा. ना. मेघनाताई बोर्डीकर, आरोग्य विभागाचे आयुक्त, संचालक, उपसंचालक, परभणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालम तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी पालम यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते भगवान करंजे, रुपेश शिनगारे, बालाजी बर्डे, विठ्ठल करंजे, रमेश शिनगारे, दत्तराव गौरकर, राजेश्वर करंजे, प्रभाकर शिनगारे, विश्वंभर वाडे, बबन डोळस आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.