आनंद ढोणे
पूर्णा: शहरातील बसस्थानक आवारात दर शनिवारी पालिकेकडून अनधिकृतरित्या भरवल्या जाणाऱ्या जनावरांच्या बाजारात सध्या एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील पशुधन बाजारात शेळ्या-बोकडांचा बाजार तेजीत सुरू आहे, तर दुसरीकडे गाय, कालवड आणि बैल यांसारख्या गोवंशीय पशुधनाचा बाजार पूर्णपणे बंद पडला आहे. या परिस्थितीमुळे पशुधन विकू इच्छिणारे शेतकरी आणि खरेदी-विक्री करणारे व्यापारी दोघेही आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या काळात गोवंशाची कत्तल होऊ नये, या उद्देशाने शासनाने ईदपूर्वी गोवंश बाजार भरवण्यावर बंदी घातली होती. यासोबतच गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाल्याने व्यापारी आणि शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, सध्या प्रत्येक शनिवारी केवळ शेळ्या-बोकडांचा बाजार तेजीत भरत असून, गोवंशीय पशुधनाची खरेदी-विक्री ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांना आपली अतिरिक्त किंवा भाकड झालेली जनावरे विकायची असल्यास, बाजार बंद असल्याने त्यांना ग्राहकच मिळत नाहीत.
पूर्वी काही व्यापारी गावोगावी फिरून पशुधन खरेदी करत असत. हे व्यापारी केवळ कत्तलीसाठीच नव्हे, तर काही नफा ठेवून इतर शेतकऱ्यांना पाळण्यासाठीही जनावरांची विक्री करत. मात्र, गोवंश हत्या बंदी कायद्याची भीती आणि बाजार बंद असल्यामुळे अशा व्यापाऱ्यांनीही गाय, कालवड, बैल यांची खरेदी करणे बंद केले आहे. यामुळे पशुधन विकणारे शेतकरी आणि हे खरेदीदार व्यापारी दोघेही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
याउलट, ज्यावर कोणतीही बंदी नाही, तो शेळ्या-बोकडांचा बाजार मात्र तेजीत सुरू असून खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने होत आहेत. अलिकडच्या काळात मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढल्याने शेळ्या आणि बोकडांना मोठी मागणी आहे. बोकडाच्या मटणाचा दर प्रति किलो ६०० ते ७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेळीपालनाला आता चांगले दिवस आल्याचे चित्र असून, अनेक मजूरदार आणि शेतकरीही शेळीपालनाकडे वळत आहेत.
दुसरीकडे, शेतीमधील मशागत, पेरणी, डवरणी यांसारखी कामे आता ट्रॅक्टरचलित यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत आणि कमी श्रमात होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे आणि बैलजोडी पाळणे त्रासाचे वाटू लागले आहे. यांत्रिकीकरण खर्चिक असले तरी, शेतकरी बैल पाळण्याऐवजी त्याला पसंती देत आहेत, ही एक मोठी शोकांतिका आहे. जे काही मोजके शेतकरी अजूनही पशुधन पाळून बैलजोडीने शेती करत आहेत, त्यांनाही अतिरिक्त किंवा भाकड जनावरे विकताना ग्राहक मिळत नाहीत. बाजारात केवळ शेळ्या-बोकड आणि म्हशींच्या खरेदीलाच तेजी दिसत आहे. या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गातून, शासनाने बंद केलेला गोवंशीय पशुधनाचा बाजार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.