गंगाखेड : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्याने देशभर शोककळा पसरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात या पार्श्वभूमीवर एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. परिणामी आज गंगाखेड येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आयोजित १ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन, लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती संयोजक तथा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे.
शहरात गुरुवारी (दि.१०) रोजी गंगाखेड-धारखेड राज्य मार्ग क्रमांक ४३४ वर गोदावरी नदीवर मोठा पूल बांधणे (किंमत ३८.४ कोटी) या विकास कामाचे लोकार्पण तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ बी वरील २ एल पीएस देवगाव फाटा-दिग्रस फाटा-सेलू-बोरगाव-पाथरी-पोहनेर फाटा-सोनपेठ-इंजेगाव (धामोनी) मध्ये रस्ता सुधारणा करणे (७६१.३८ कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ के वरील २ एल गंगाखेड-किनगाव मध्ये रस्ता सुधारणा करणे (१६२.६७) या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडणार होते. मात्र रतन टाटा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
देशाच्या आर्थिक विकासात तसेच करोडो नागरिकांच्या सर्वांगीण विकासात उद्योगपती रतन टाटा यांचे योगदान मोलाचे आहे. रतन टाटा हे सच्चे देशभक्त होते. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक उद्योगरत्न गमावला असून कधीही न भरून निघणारी ही पोकळी आहे.