परभणी : परभणी - पिंगळी रोडवर शेंद्रा फाट्याजवळ बुधवारी रात्री प्रवासी ॲटो - ट्रकमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी ॲटोचालक दिनेश रत्नप्रकाश कांबळे हा प्रवास घेऊन पिंगळीकडे जात होता. यावेळी शेंद्रा पाटीनजीक समोरून आलेल्या दोन व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक व ॲटोची समोरासमोर धडक होऊन यात दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयतामध्ये आप्पाराव माहोरे (20) रा. बोथी, ता. कळमनुरी, ह.मु. पिंगळी, गंगाधर कचरुबा लोखंडे (35) रा. शेंद्रा, राजकुमार गौतम लोखंडे (48) रा. पिंगळी, शेख वजीर शेख रज्जाक वय (36) यांचा मृत्यू झाला. तर ऑटोचालक दिनेश रत्नप्रकाश कांबळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रक क्र. एमएच -26- एच- 6553 च्या चालकावर नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, सपोनि दळवे, पोउपनि भोसले, पोउपनि गुलाब भिसे, आर. एस. मुंढे यांनी भेट दिली.
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयापासून शेंद्रा गावचा जुना फाटा केवळ 6 कि.मी. अंतरावर आहे. घटना घडल्यानंतर तब्बल दीड तासांनंतर रुग्णवाहिका पोहोचल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्यामुळे जखमींना उपचार मिळू शकले नाहीत.