Female police officer molested; Assistant Police Sub-Inspector suspended
परभणी, पुढारी वृत्तसेवा : पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस शिपायाची छेड काढल्याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षकास निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी काढले आहेत.
पोलिस मुख्यालयात कार्यरत महिला पोलिस शिपायाची छेड काढण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी पोलिस मुख्यालयात घडला होता. या प्रकरणाची परभणीच्या पोलिस दलामध्ये चर्चा झाली होती, परंतु संबंधित महिला पोलिस शिपायाने आपली बदनामी होईल म्हणून कुठेही या प्रकरणाची वाच्यता केली नव्हती.
संबंधित सहायक पोलिस उपनिरीक्षकाने महिला पोलिस शिपायास पुन्हा काम शिकविण्याच्या बहाण्याने छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्याने विरोध केला असताना सहायक पोलिस उपनिरीक्षक याने चुकून झाले अशी सारवासारव केली होती.
या प्रकरणात पोलिस दलाची प्रतिमा डागाळू नये म्हणून पोलिस अधीक्षक परदेशी यांनी कार्यवाही केली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक विशाल लाड यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले आहेत. घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.