गंगाखेड : तालुक्यातील खळी ते ब्रह्मनाथवाडी पांदण रस्त्याच्या बोगस कामाच्या चौकशीची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. तब्बल सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणानंतर प्रशासन दखल घेत नसल्याने आज (दि. 10) गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
पांदण रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम आणि त्यासंबंधी चौकशीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. 10 जून रोजी सकाळी 11 वाजता जलसमाधी आंदोलनाची घोषणा करत शेतकऱ्यांनी गोदावरी नदीच्या पाण्यात उतरून निषेध नोंदवला. यावेळी गंगाखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन दिवसांच्या आत मोजमाप करून रस्त्याच्या कामाची पुन्हा सुरुवात केली जाईल तसेच बोगस काम करणाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
या आश्वासनावर आंदोलनकर्ते तात्पुरते शांत झाले असले तरी जोपर्यंत कामाची प्रत्यक्ष सुरुवात होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनात विजय सोन्नर, दत्ता मूलगिर, बालू भंडे, पिंटू पवार यांच्यासह अनेक शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.