Gangakhed Parbhani road blockade
गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील जी सेवन साखर कारखाना व परभणी तालुक्यातील लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार रुपये पहिला हप्ता द्यावा, तसेच उसाला चार हजार रुपये प्रति टन दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी खळी फाटा येथे सोमवारी (दि. १५) सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे गंगाखेड–परभणी रस्त्यावरील वाहतूक तब्बल पाच तास ठप्प झाली होती.
उसाला चार हजार रुपये प्रति टन दर देण्यात यावा व पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा, अन्यथा १५ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी यापूर्वी निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता खळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत एफआरपी वाढवून देण्याची जोरदार मागणी केली.
या आंदोलनात माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम, श्रीकांत भोसले, राजन क्षीरसागर, ओंकार पवार, राजेश फड, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश संघटक यशवंत भालेराव, शेतकरी संघटनेचे बंडू सोळंके, अजय बुरांडे, सुरेश विखे, गोपीनाथ भोसले, कृष्णा भोसले, राजेभाऊ कदम यांच्यासह परिसरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा लांबच लांब लागल्या होत्या. काही प्रवासी वाहतूक सुनेगाव–मुळी–धारखेड मार्गे वळविण्यात आली होती.
दुपारी तीन वाजता आंदोलनातील शिष्टमंडळ जी सेवन साखर कारखान्यावर कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे यांच्यासोबत चर्चेसाठी गेले. या चर्चेनंतर १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निर्णयासाठी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.शिष्टमंडळात राजन क्षीरसागर, डॉ. सुभाष कदम, बंडू सोळंके, श्रीकांत भोसले, अजय बुरांडे आदींचा समावेश होता.