Parbhani Chudawa Farmer Hunger Strike
पूर्णा: चुडावा (ता. पूर्णा) येथील शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई यांनी शुक्रवार (दि. ६) पासून श्रीक्षेत्र गंगाजी बापू देवस्थानात पाईपलाईन आणि विहीरची नोंद करून मावेजा मिळण्यासाठी आमरण उपोषण चालू केले आहे. आज (दि. ८) उपोषणाचा तिसरा दिवस आहे. अन्न पाण्याविना त्यांची प्रकृती खालवत आहे. दरम्यान, महसूल, ग्रामीण पाणी पुरवठा, भूसंपादन कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
उपविभागीय अधिकारी (भूसंपादन गंगाखेड) , जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूमिअभीलेख, तहसीलदार यांनी शेतकऱ्याच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील जालना ते नांदेड द्रुतगती मार्गात उपोषणकर्ते शेतकरी व्यंकटराव देसाई व त्यांच्या संयुक्त कुटुंबातील जमीन गेली आहे.
महामार्गासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीतील पिंपळगाव लिखा गट क्र. १५८ मध्य विहीर व आलेगाव शिवारात गट नं. २०५ मधील ३ व ६ इंच पाईपलाईनची नोंद घेण्यात आलेली नाही. येथील शेतशिवार सिंचनाखाली आणण्यासाठी त्यांनी सन २००९ साली गोदावरी नदीवरुन ६ इंचीच्या ४५० पाईप छड्या जमिनीत गाडून आणल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आणि कागदपत्रे सादर केली होती. तरीही नोंद करण्यात आलेली नाही.
विहीर नसूनही जवळपास ३० पेक्षा अधिक बोगस नोंदी घेऊन कोट्यवधी रुपये खोटी मावेजा रक्कम अदा करण्यात आली आहे. हे प्रकार तलाठी यांच्या संगनमताने करण्यात येऊन मोठा घोटाळा केला आहे. त्याच बरोबर एका मृत महिलेच्या नावे शेतात पाईपलाईन विहीर नसतानाही खोटी नोंद दाखवून मावेजा रक्कम उचलली आहे. आणि माझ्या शेतात खरोखर पाईपलाईन विहीर असूनही नोंद घेतलेली नाही. आधी बोगस पाईपलाईन नोंदणी करुन मावेजा उचललेल्या जमिनीत पाइपलाइन खोदून पाहावी. व त्यानंतर माझ्याही जमिनीतील पाईपची तपासणी करावी, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी दिली आहे.