Purna Dhangar Takli incident
पूर्णा : तालुक्यातील धनगर टाकळी गावात एकाने शेतातील पाण्याच्या वादातून एका शेतकऱ्यावर ऊसतोडणी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली असून, चुडावा पोलिस ठाण्यात ८ ऑक्टोबर रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी शेतकऱ्याचे नाव गजानन गंगाधर साखरे (वय ४१, रा. धनगर टाकळी) असे आहे. फिर्यादी गजानन साखरे यांनी आपल्या शेजारील शेतकरी विश्वनाथ लक्ष्मण साखरे यास "तुझ्या शेतातील पाणी आमच्या शेतात येऊ देऊ नको" असे सांगितल्याने आरोपी संतापला. त्यानंतर आरोपीने अहिल्यादेवी होळकर चौक, धनगर टाकळी येथे कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गजानन साखरे यांच्या मानेजवळ, डोक्यात आणि हातावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचा तपास सपोनि सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अरुण मुखेडकर करीत आहेत.