Eicher truck transporting cattle illegally intercepted in the Raikheda area
चारठाणा, पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. संभाजीनगर-नांदेड राज्य महामार्गावरील रायखेडा शिवारात शनिवारी (दि.23) पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी संशयास्पद आयशर अडवून तपासणी केली असता त्यात तब्बल 10 पशुधन कोंबून नेले जात असल्याचे आढळले. पोलिसांनी तातडीने सर्व पशुधनाची सुटका केली. या कारवाईत आयशरसह पशुधन असा सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, चालकासह तिघांविरुद्ध चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सपोउपनि उद्धव माने, पोलिस कर्मचारी
खरात, दोन होमगार्ड रात्रीला रायखेडा परिसरात गस्त घालत होते. यावेळी जालन्याकडून वसमतकडे जाणाऱ्या एमएच 02 ईआर 6405 क्रमांकाच्या आयशर वाहनाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनाची झडती घेतली असता आयशरमध्ये 10 पशुधन अत्यंत दाटीवाटीने व कोंबून भरल्याचे निदर्शनास आले.
याबाबत चालक व वाहनातील अन्य दोन व्यक्तींकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र तिघांकडून समाधानकारक माहिती न मिळता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी तत्काळ आयशर वाहन ताब्यात घेऊन चारठाणा ठाण्यात आणले. तसेच वाहनातील 10 पशुधनाची सुटका करून त्यांना इटोली येथील गोशाळेत सुरक्षित पाठविले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या पशुधनाची अवैध वाहतूक रोखण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी 10 पशुधनाची अंदाजे किंमत 4 लाख, तर अवैध वाहतुकीसाठी वापरलेल्या जुन्या आयशस्ची किंमत अंदाजे 4 लाख असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सपोउपनि उद्धव माने यांच्या फिर्यादीवरून रमेश सुरेश गायकवाड (वय 38, रा. गणेशपूर, ता. वसमत, जि. हिंगोली), आदेश गौतमराव मस्के (वय 24, रा. आंबेडकरनगर, वसमत) आणि साजिद वहाब शेख (रा. वसमत) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमातील कलम 5 (अ), 5(ब), 9, प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियमातील कलम 11 (1) (ड) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 125 (ई) व अन्य संबंधित कलमांनुसार कारवाई केली. सपोनि बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनात कारवाई झाली. तपास पोउपनि वाघ हे करीत आहेत.
रात्रीच्या गस्तीमुळे अवैध वाहतूक उघड
रात्रीच्या वेळी महामार्गावरून संशयास्पद पद्धतीने जाणाऱ्या वाहनाची पोलिसांनी केलेली तपासणी या कारवाईत निर्णायक ठरली. पोलिसांनी वेळीच आयशर अडविल्याने दहा पशुधनाची सुटका झाली. या घटनेमुळे महामार्गावरून होणाऱ्या पशुधनाच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी अधिक कडक नजर ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.