परभणी

परभणी : श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दत्त जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात

backup backup

परभणी, पुढारी वृत्तसेवा : मागील आठवडा भरापासून सुरू असलेला दत्त जन्मोत्सवाचा सोहळा मंगळवारी (दि. २६)सायंकाळी वसमत रोडवरील श्री क्षेत्र दत्तधाम येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत व किर्तनाच्या गजरासह गुलालाच्या उधळणीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील विविध दत्त मंदिरातूनही दत्त जन्मोत्सवाचा सोहळा भाविकांनी साजरा केला.

वसमत रोडवरील श्री क्षेत्र दत्तधाम येथे मागील आठवडाभरापासून गुरूचरित्र पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. दत्तात्रयाचे सर्वात मोठे धाम म्हणून ओळख असलेल्या या श्री दत्त मंदिराचा हा वार्षिक सोहळा अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत असतो. दररोज दत्ताभिषेक व अन्य उपक्रमांसह महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो. मागील 2 दिवसांपासून दत्त जन्मोत्सवाच्या सोहळ्याने मोठा वेग घेतला. परिसर स्वच्छतेसह विद्युत रोषणाई व जन्मोत्सवाच्या दिवशी विविध रंगी फुलांतून साकारलेली भव्य-दिव्य रांगोळी हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असते. याही वर्षी सोमवारपासून सुरू झालेली ही फुलांची रांगोळी मंगळवारी पुर्ण झाल्यानंतर ती लक्षवेधक ठरली. सकाळपासुनच भाविकांनी श्री दत्ताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी महाप्रसादानंतर सायंकाळी 6 वाजता जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्यानंतर संस्थानाधिपती मकरंद महाराज यांच्या उपस्थितीत किर्तनाचा सोहळा रंगला.

शहरातील विद्या नगर भागातील वैष्णवी मंगल कार्यालयासमोरून दत्त मंदिरातही दत्त जन्मोत्सवाच्या सोहळ्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय होती. फुलांच्या सुंदर आरासेसह श्री दत्ताच्या मुर्तीवरील फुलांच्या हारांनी लक्ष वेधून घेतले. सायंकाळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. त्याचबरोबर शिवाजी नगर, कारेगाव रोडवरील विकास नगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातही दत्‍त जन्मोत्सवाच्या सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते. याशिवाय विविध दत्त मंदिरातूनही दत्त जन्मोत्सवाचा उत्साह दिसून आला.

SCROLL FOR NEXT