चारठाणा : मागील काही दिवसापासून दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याची दखल घेत पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील अपघात कमी करण्याच्या हेतूने दारू प्राशन करून दुचाकी चालविणाऱ्यांविरूद्ध कारवाई मोहीम राबवली आहे.
चारठाणा पोलीसांच्या वतीने १ ते ३१ जानेवारी दरम्यान २० दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. कार्यवाही करून सेलू न्यायालयासमोर संबंधितांना हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी एक हजार प्रमाणे २० दुचाकीस्वारांना २० हजारांचा दंड ठोठावला आहे. .
चारठाणा परिसरात मागील काही दिवसांपासून दारू प्राशन करून वाहन चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असुन अनेक जण प्राणास मुकले. तर अपघातामुळे काहीना अपंगत्व आले आहे. त्यामुळे सदर मोहिम हाती घेण्यात आली असून वाहन चालविताना दारू पिऊन आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा साहयक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे यांनी दिला आहे.