डॉ. स्वाती भिसे Pudhari news
परभणी

Parbhani|चीनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. स्वाती भिसे यांची निवड

चीनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ स्वाती भिसे यांची निवड

पुढारी वृत्तसेवा

मानवत : तालुक्यातील कोल्हा येथील रहिवाशी व अंधेरी येथील तोलानी वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त)च्या इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. स्वाती रामकिशन भिसे यांची चीनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. सिचुआन विद्यापीठ, चेंगडू येथे ही परिषद आयोजित करण्यात आलीय. २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या “रिमॅपिंग न्यू वर्ल्ड लिटरेचर अँड कल्चर” या परिषदेत त्या आपला संशोधन निबंध सादर करणार आहेत.

डॉ. भिसे यांचा “इकोलिब्रियम ऑफ पॉवर : लिंगाधारित पर्यावरणीय विचार आणि ग्लोबल साऊथमधील शीतयुद्धकालीन साहित्यातील आंतरविभागीय पर्यावरण-स्त्रीवादी प्रतिकार” हा संशोधन निबंध परिषदेसाठी स्वीकारण्यात आला आहे.

या संशोधनात शीतयुद्धाच्या काळातील साहित्यामध्ये पर्यावरण, स्त्रिया आणि सत्ता केंद्रित व्यवस्था यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनात पर्यावरणीय ऱ्हास आणि स्त्रियांचे शोषण यामागील समान सामाजिक-सत्तात्मक रचना अधोरेखित करण्यात आली आहे.

तसेच स्त्रिया, उपेक्षित समाजघटक आणि पर्यावरण यांच्याशी निगडित संघर्ष व प्रतिकार यांचा पर्यावरण-स्त्रीवादी दृष्टिकोनातून सखोल अभ्यास सादर करण्यात आला आहे. पर्यावरणीय न्याय, सामाजिक समता आणि शाश्वत विकासासाठी साहित्याची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे या संशोधनातून मांडण्यात आले आहे.

डॉ. भिसे यांच्या संशोधनातील वैचारिक सखोलता आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाची दखल घेत इकोसॉफिकल फाउंडेशन फॉर द स्टडी ऑफ लिटरेचर अँड एन्व्हायर्नमेंट (EFSLE) या संस्थेने त्यांना ‘ईएफएसएलई चायना ट्रॅव्हल ग्रँट २०२६’ प्रदान केला आहे. या अनुदानाअंतर्गत त्यांच्या चीनमधील परिषदेसाठीच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च उचलण्यात येणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल तोलानी वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त)च्या व्यवस्थापनाने आनंद व्यक्त केला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. साधना वेंकटेश यांनी डॉ. भिसे यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “डॉ. स्वाती भिसे यांची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी झालेली निवड ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या संशोधनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून विद्यार्थ्यांसाठीही हे प्रेरणादायी यश आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT