District-wide 'Two Drops' campaign to defeat polio.
परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभरविवारी (दि. २८) जिंतूर तालुक्यातील कसर येथे आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहात झाला. पालकमंत्र्यांनी एका चिमुकल्याला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची औपचारिक सुरुवात केली.
दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी या घोषवाक्यासह सुरू झालेल्या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पोलिओमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपली जबाबदारी ओळखून मुलांना पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन केले. देश पोलिओमुक्त राखण्यासाठी शासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही सांगितले. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत यंदा जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ८४५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. त्यासाठी जिल्हाभरात १ हजार ६२३ पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले असून, आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले.
बूथवर लसीकरणासह आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरभेटी देऊन वंचित बालकांचा शोध घेण्याचेही नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, दुर्गम भागातही विशेष पथके कार्यरत आहेत. सर्व पालकांनी आपल्या ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून या राष्ट्रीय आरोग्य अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमास पं.स. सभापती किशोर खिस्ते, माधव दराडे, बाजार समिती सभापती आत्माराम पवार, पं.स. सभापती बाळासाहेब साखरे, वजीर, महिला जिल्हाध्यक्षा तथा जि.प. सदस्या सारिका पारवे, तारामती गलांडे, तहसीलदार शीतल कच्छवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी जयश्री दीपके, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिओसारख्या गंभीर आजारावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लसीकरण हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याने, प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला वेळेत पोलिओची लस देऊन त्याचे आरोग्यदायी व सुरक्षित भविष्य घडवावे, असा संदेश मोहिमेद्वारे देण्यात आला आहे.