पाथरीत उसाच्या फडात हरणाचा फाडशा; बिबट्याने शिकार केल्याचा संशय 
परभणी

Parbhani News : पाथरीत उसाच्या फडात हरणाचा फाडशा; बिबट्याने शिकार केल्याचा संशय

झरी परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

पाथरी : तालुक्यातील झरी येथील शेख शकील यांच्या शेतातील उसाच्या फडात सोमवारी (दि. १०) एक हरिण छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडली आहे. बिबट्याने त्याची शिकार केली असावी, असा संशय परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या पथकात वनपाल बी. के. दुधारे, वनपाल एस. बी. नाईक, वनरक्षक गणेश करे आणि वाहनचालक सुरेश सावंत यांचा समावेश होता. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून तिथे वन्यप्राण्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. हे ठसे नेमके बिबट्याचे आहेत की तडसाचे, याबाबत वन विभागाकडून तांत्रिक तपासणी सुरू आहे.

आठ दिवसांपूर्वी मुदगल शिवारातही अशीच घटना

गेल्या आठ दिवसांपूर्वी मुदगल शिवारातही अशाच पद्धतीने हरणाचा फाडशा पाडण्यात आला होता. त्यावेळी वन विभागाच्या तपासात तडसाने हल्ला केल्याचे समोर आले होते. आता झरी शिवारात पुन्हा ही घटना घडल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. मात्र, वन विभागाकडून या प्राण्याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने झरी व परिसरातील शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने जाणे टाळावे, वन्यप्राण्याच्या कोणत्याही हालचाली निदर्शनास आल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT