परभणी : छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथील कारकिर्दीत वादग्रस्त ठरलेल्या परभणीच्या जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह क्रिडा अधिकारी नानकसिंग बस्सी (रा.नांदेड) यांना अडीच लाख रूपयांची मागणी करीत दीड लाख रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने गुरूवारी (दि.27) दुपारी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिले काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
आपल्या कार्यपद्धतीने वादग्रस्त ठरलेल्या क्रिडा अधिकारी नावंदे यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेना ठाकरे गटाचे आ.डॉ.राहूल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.राजेश विटेकर यांनी विधानसभेत बुधवारीच राज्य सरकारकडे विचारणा करीत त्यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. दुसर्याच दिवशी लाच घेताना नावंदे या जाळ्यात अडकल्याने लोकप्रतिनिधींच्या तक्रारींवर शिक्कामोर्तब झाला आहे.
याबाबत माहिती अशी, 2024 मध्ये एका क्रिडा अकॅडमीने क्रिडा स्पर्धा घेतल्या होत्या. त्यासाठीचे पाच लाख रूपये व त्या संस्थेच्या जागेवर करण्यात आलेल्या स्विमींग पुलचे काम 90 टक्के पूर्ण झाल्याने संबंधित संस्थेने पुलाचे 90 लाख रूपयांचे व स्पर्धेचे 5 लाखाचे बिल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे दाखल केले होते. ही बिले मंजूर करण्यासाठी संबंधित संस्थेच्या पदाधिकार्याने 3 मार्च रोजी नावंदे व क्रिडा अधिकारी नानकसिंग बस्सी यांची भेट घेवून बिलाची मागणी केल्यानंतर नावंदे यांनी स्वतःसाठी 2 लाख रूपये व बस्सी यांच्यासाठी 50 हजार अशा एकूण 2 लाख 50 हजार रूपयांची मागणी केली. त्यावर बिलामध्ये जाणीवपुर्वक त्रुटी काढल्या जातील. या कारणाने 13 मार्च रोजी संबंधिताने नावंदे यांना 1 लाख रूपये दिले होते. उर्वरीत दिड लाख रूपयांची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने संबंधिताने सोमवारी (दि.24) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. त्याच दिवशी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, या दोन्ही अधिकार्यांची भेट झाली नाही. मंगळवारी पुन्हा करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान नावंदे यांनी उर्वरीत रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे लाचलुचपतने गुरूवारी सापळा रचला असता, क्रिडा अधिकारी नानकसिंग बस्सी यांनी दीड लाख रूपयांची मागणी करीत ती रक्कम घेण्याचे तयारी दर्शवित नावंदे यांच्या दालनात घेवून गेले. तेथे या दोघांनीही लाचेची रक्कम स्विकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले.