Parbhani Political News : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी स्पर्धा वाढली  File Photo
परभणी

Parbhani Political News : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी स्पर्धा वाढली

बाबाजानी दुर्राणी, तुकाराम रेंगे पाटील चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

परभणी, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपद निवडीविषयी पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही उत्सुकता लागली आहे. नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी आ. बाबाजानी दुर्राणी आणि माजी खा. तुकाराम रेंगे पाटील यांची नावे चर्चेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी बेरजेचे राजकारण करत जिल्हाध्यक्षपदाची निवड करतील असे संकेत मिळत आहेत.

माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रारंभी बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब रेंगे, रविराज देशमुख यांची नावे समोर आली होती. माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव समोर आले आहे. माजी आ.दुर्राणी यांचे नाव समोर आल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष अॅड. तुकाराम रेंगे पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त करत आपणही स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले आहे.

माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी भाजपात प्रवेश केला, त्याचदिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालना येथे परभणी येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मते जाणून घेतली होती. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे निरीक्षक म्हणून जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनीही तालुकानिहाय बैठका घेत संघटनात्मक बांधणी व जिल्हाध्यक्षपदाच्या संदर्भात चर्चा केली होती. माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षप्रवेशापूर्वीच खा. इमरान प्रतापगढी, कन्हैया कुमार यांची भेट घेत चर्चा केली होती. पुणे येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या शिबिरात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथल्ला यांचीही बाबाजानी यांनी भेट घेऊन चर्चा केली होती.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते मंडळींना बाबाजानी दुर्राणी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवू असा शब्द दिला आहे. अनेकजण सत्ताधारी पक्षात जात असताना बाबाजानी यांनी वेगळी वाट निवडत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे हा प्रवेश काँग्रेसवासीयांसाठी दिलासा देणारा ठरला आहे. राजकारणातील चार दशकांचा अनुभव आणि अल्पसंख्याक असल्या कारणाने काँग्रेस पक्षश्रेष्ठी जिल्हाध्यक्षपदाची माळ बाबाजानी दुर्राणी यांच्या गळ्यात टाकू शकतात. परभणी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी बाबाजानी दुर्राणी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते.

एकंदरीतच काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी पूर्वी मोठया प्रमाणात चर्चेत असलेली नावे चर्चेतून गायब होऊन नवीन नावे समोर आली आहेत. काँग्रेसचा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कोण? याविषयी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपद निवडीसाठी पक्षश्रेष्ठी जास्त वेळ घेणार नाहीत असे संकेत मिळत आहेत.

सपकाळांची साथ कुणाला?

काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय हा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हेच घेणार आहेत. बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात सपकाळ यांनी दुर्राणी यांचे तोंडभरून कौतुक केले होते. जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षात स्पर्धा निर्माण झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची साथ कुणाला मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT