Purna Communist Party Protest vs MLA Ratnakar Gutte
पूर्णा : गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पूर्णा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत ‘डॉन’ चित्रपटातील गाण्यावर हातवारे व हावभाव करत नृत्य केल्याचा तसेच निवडीनंतरच्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ने जाहीर निषेध केला आहे.
आमदार गुट्टे यांनी भाषणात, “कोणतेही निवेदन किंवा तक्रार आली तर ती थेट कचऱ्याच्या टोपलीत टाकू, कुणालाही घाबरणार नाही,” असे विधान केल्याने लोकप्रतिनिधीच्या भूमिकेला शोभणारे नाही, असा आरोप माकपने केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत माकपचे नसीर कादर, अशोक एंगडे, पांडुरंग दुथडे, सुबोध खंदारे आणि शुभम गायकवाड यांनी आज (दि. २२) नगरपरिषद कार्यालयात पालिका कर्मचारी नंदकुमार चावरे यांच्याकडे निवेदन सादर केले. हे निवेदन मुख्याधिकाऱ्यांमार्फत विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आले आहे.
निवेदनात माकप कार्यकर्त्यांनी कडक शब्दांत सवाल उपस्थित केले आहेत. “स्वतःला डॉन समजणारी व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून शोभते का? हातवाऱ्यांतून डॉनगिरी करणारे आमदार समाजाला, विशेषतः तरुणांना, कोणता आदर्श देऊ इच्छितात? निवेदनांना केराची टोपली दाखवणारी भूमिका ही लोकशाही मूल्यांना धरून आहे का?” असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच आमदार गुट्टे यांच्या पक्षाकडून निवडून आलेले पूर्णेतील नगरसेवक व त्यांना पाठिंबा देणारे घटक या भूमिकेशी सहमत आहेत का, याचीही स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच विकासकामांच्या दाव्यांवरही माकप व डीवायएफआयने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी डीवायएफआयकडून वारंवार निवेदने, मोबाईल संदेश व दूरध्वनी करूनही आमदारांनी दुर्लक्ष केले. तालुक्यातील कोल्हेवाडी येथील रस्त्यासाठी ग्रामस्थांसह केलेल्या पाठपुराव्यालाही दखल मिळाली नाही. पूर्णा बसस्थानकाच्या कामासाठीही अनेकदा पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
अखेरीस कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बसस्थानक सुधारण्यासाठी सुधारित अंदाजपत्रकानुसार कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करून घेतली, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात” करणारे आमदार इतरांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप करत डीवायएफआयने या प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवून संबंधित प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हे निवेदन सादर करताना कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने पूर्णा शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.