Arjun Borade Funeral Pudhari
परभणी

Arjun Borade Funeral : कमांडो प्रशिक्षक अर्जुन बोराडे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणांनी खादगाव दुमदुमले; शासकीय मानवंदनेसह अंत्यसंस्कार

पुढारी वृत्तसेवा

परभणी : देशसेवेचा ध्यास घेऊन भारतीय सैन्यात कमांडो प्रशिक्षक म्हणून हजारो जवानांना प्रशिक्षित करणारे सेलू तालुक्यातील खादगावचे वीरपुत्र अर्जुन बोराडे यांचे शनिवारी (दि. २८) अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. रविवारी (दि. २९) त्यांच्या मूळगावी खादगाव येथे शोकाकुल वातावरणात शासकीय मानवंदनेसह अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला.

कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अर्जुन बोराडे यांनी भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेचा मार्ग निवडला होता. प्रारंभी सैनिक म्हणून सेवा बजावल्यानंतर त्यांनी कमांडो प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. बंगळूरु येथे कार्यरत असताना त्यांनी हजारो जवानांना कमांडो प्रशिक्षण दिले. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यासोबतच देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज राहण्याचे धडेही त्यांनी जवानांना दिले. मात्र, सेवेत असतानाच त्यांना अन्ननलिकेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. या दुर्धर आजाराशी झुंज देत असतानाच शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

रविवारी खादगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदल, पोलीस दल आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शासकीय मानवंदना दिली. वीर जवानाच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळासाहेब बोराडे यांनी पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले.

‘हजारो जवानांना देशसेवेसाठी सज्ज केले’

आमचा भाऊ देशसेवेसाठी समर्पित होता, याचा आम्हाला सार्थ अभिमान होता. कमांडो प्रशिक्षक म्हणून त्यांनी हजारो जवानांना देशसेवेसाठी सज्ज केले. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविले. मात्र, अचानक उद्भवलेल्या कर्करोगाने आमच्या भावाला हिरावून घेतले. देशसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांचे बंधू अभियंता शिवराज आश्रोबा बोराडे यांनी व्यक्त केली.

अर्जुन बोराडे यांच्या निधनाने खादगावसह संपूर्ण सेलू तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. देशसेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या वीरपुत्राच्या निधनाने खादगावने आपला अभिमान गमावला असून, त्यांच्या कार्याच्या आठवणींनी संपूर्ण परिसर हेलावून गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT