परभणी : गंगाखेड नगरपालिकेच्या हद्दीतील खरेदी करण्यात येणाऱ्या प्लॉटचे खरेदी खत करून देण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच मागून ४ हजार रूपये स्विकारणाऱ्याची तयारी दर्शविणाऱ्या गंगाखेडमधील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक प्रकाश विठ्ठलराव टाक (रा. लोकमान्य नगर, परभणी) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याबाबत माहिती अशी, गंगाखेड शहरातील एका नागरिकास पालिका हद्दीतील प्लॉट खरेदी करायचा असल्याने त्यांनी ३ डिसेंबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात कनिष्ठ लिपिक प्रकाश टाक यांच्याशी संपर्क साधला. खरेदी खत करण्यासाठी किती फि लागेल. याबाबत त्यांनी विचारणा केल्यानंतर टाक याने त्यांना ६ ते ७ हजार रूपये फी व त्या व्यतिरिक्त दहा हजार रूपये लागतील, असे सांगितले.
फीस व्यतिरिक्त दहा हजार रूपये मागितल्याने संबंधिताने त्याच दिवशी परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. खात्याने दुसऱ्याच दिवशी ४ डिसेंबर रोजी या प्रकाराची पडताळणी केली असता, खरेदीखत करून देण्यासाठी लागणाऱ्या ७७ रूपयांच्या शासकीय शुल्कासह इतर पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी टाक यांनी केल्याने निष्पन्न झाले, त्यावेळी झालेल्या तडजोडीत लिपीक टाक याने ४ हजार रूपयांची मागणी करून ती स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाचा अतिरीक्त पदभार असलेल्या प्रकाश टाक याच्याविरुद्ध कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सुरू केली. यावेळी रचलेल्या सापळ्यात खात्याचे निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, सहाय्यक फौजदार निलपत्रेवार, हवालदार, भुमकर, कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली.